के. जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी पालखी सोहळा उत्साहात
विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी साकारला भक्तिमय वारकरी सोहळा; सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण झाले मंगलमय
योगेश पाटील धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव येथील के. जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पायी दिंडी पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी (दि. २५) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी तसेच संत आणि वारकरी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी शाळेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना केळीचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देतानाच भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
