एरंडोल येथे आदिवासी विकास विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी अमोल पाटील यांचा पाठपुरावा
यावलपर्यंतची आदिवासी नागरिकांची धावपळ थांबणार; पारोळा येथे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहासाठीही मागणी
विनोद मोरे कल्याने होड | प्रतिनिधी :
“जनतेच्या हक्काच्या सुविधा त्यांच्या दारी पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा…” या उद्देशाने एरंडोल विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी आमदार मा. अॅड. अमोलदादा पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अनुसूचित जमातीच्या नागरिकांना शासकीय योजना, दाखले, प्रमाणपत्रे तसेच आदिवासी विकास विभागाच्या सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा, यासाठी एरंडोल येथे आदिवासी विकास विभागाचे उपविभागीय कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एरंडोल व पारोळा परिसरातील आदिवासी समाजातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी सध्या यावल येथे जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रमांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील आणि आमदार मा. अॅड. अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एरंडोल येथे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मात्र, अद्याप या कार्यालयासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित न झाल्याने कार्यालय प्रत्यक्ष सुरू होऊ शकलेले नाही. याबाबत आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. अशोकजी उईके यांची भेट घेऊन शासन निर्णय तातडीने जारी करून कार्यालय कार्यान्वित करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील सविस्तर लेखी निवेदनही सादर केले.
पारोळा येथे आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाची मागणी
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शिक्षणासाठी इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये आणि निवासाची योग्य व्यवस्था मिळावी, यासाठी पारोळा येथे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.
यासंदर्भातही आदिवासी विकास मंत्र्यांना लेखी निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर मिळणार शासकीय सेवांचा लाभ
एरंडोल येथे उपविभागीय कार्यालय सुरू झाल्यानंतर मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ स्थानिक पातळीवरच मिळणार असून, यावलपर्यंतची त्यांची धावपळ कमी होणार आहे. तसेच पारोळा येथे विद्यार्थी वसतिगृह मंजूर झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
