अवैध वाळूचा डंपर पकडणाऱ्या तहसीलदारांनाच धमकी; माफियांनी अधिकाऱ्यांसमोरच वाळू रिकामी करून डंपर पळवला
बोदवड तालुक्यात महसूल पथकावर दबावाचा प्रयत्न; तहसीलदारांनी मोबाईलमध्ये कैद केला प्रकार, चालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल
भुसावळ | प्रतिनिधी :
जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या तापी-पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांनाच धमकावल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यात समोर आली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून तहसील कार्यालयाकडे नेत असताना काही व्यक्तींनी महसूल पथकाचा रस्ता अडवून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत डंपर पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना कोल्हाडी शिवारातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार सपकाळे, नायब तहसीलदार अनिल नाडे आणि महसूल कर्मचारी सचिन पाटील यांच्या पथकाने कोल्हाडी-बोदवड मार्गावर कारवाई करत एमएच २८ बीबी ७९३५ क्रमांकाचा वाळू भरलेला डंपर ताब्यात घेतला.
डंपर चालकाकडे आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याने महसूल पथकाने पुढील कारवाईसाठी डंपर तहसील कार्यालयाकडे रवाना केला. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि महसूल सेवक ज्ञानेश्वर सुरडकर हे स्वतः डंपरमध्ये बसले होते.
उड्डाणपुलाजवळ रस्ता अडवून केली दमदाटी
नाडगाव उड्डाणपुलाजवळ पोहोचताच एमएच १४ जीए ८४४७ क्रमांकाची महिंद्रा स्कॉर्पिओ डंपरसमोर आडवी लावण्यात आली. स्कॉर्पिओमधून आलेल्या चार जणांसह दुचाकीवरून आलेल्या काही व्यक्तींनी महसूल पथकाला अडवून दमदाटी केल्याचा आरोप आहे.
या व्यक्तींनी डंपरचा दरवाजा उघडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना खाली उतरवले. त्यानंतर डंपरमधील वाळू रस्त्याच्या कडेला रिकामी करून डंपर घेऊन तेथून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तहसीलदारांनी मोबाईलमध्ये कैद केला प्रकार
घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक आकाशसिंग ठाकूर (रा. सालीपुरा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) आणि त्याच्या सहा अज्ञात साथीदारांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी
जळगाव जिल्ह्यातील विविध मार्गांवरून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले व दबाव आणण्याच्या घटनांमुळे प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल अधिकारी जीव धोक्यात घालून कारवाई करत असताना अशा प्रकारे शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बोदवड पोलीस आता संबंधित वाळू माफियांवर कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
