भवरखेड्यात गोठ्यात बांधलेली बैलजोडीसह गाय चोरीला; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा डाव; वाढत्या जनावर चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप
भवरखेडे | प्रतिनिधी : अजय बाविस्कर
धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेली बैलजोडी आणि दुधाळ गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भवरखेडे येथील शेतकरी हिरालाल परशुराम पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील गोठ्यात घरासमोरील आवारात एक बैलजोडी व एक दुधाळ गाय बांधली होती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मालवाहू वाहन किंवा पिकअपच्या सहाय्याने ही जनावरे लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी शेतकरी हिरालाल पाटील गोठ्यात गेले असता जनावरे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र जनावरांचा कोणताही मागमूस लागला नाही.
चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये बळकट बैलजोडी आणि एका गावरान गायीचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे शेतकरी हिरालाल पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परिसरात जनावर चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेली जनावरे परत मिळवून द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
