शासकीय अनुदानाच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा आरोप; अजनाळेतील महिलांची पत्रकार परिषद, कठोर कारवाईची मागणी
कांदा मशीन अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा आरोप; पोलीस पाटलासह तिघांविरोधात तक्रार, निष्पक्ष चौकशीची मागणी
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील अजनाळे गावात कांदा मशीनसाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत गावातील महिलांनी आणि तक्रारदारांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
पत्रकार परिषदेत तक्रारदार विनोद चव्हाण यांनी मनिष भोसले, अनुसया भोसले तसेच विनोद कांतीलाल पवार (रा. सडगाव, हेंकळवाडी पोलीस पाटील) यांच्याविरोधात गंभीर आरोप केले.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या विविध योजनांतून ₹७० हजारांचे अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत गावातील अनेक नागरिकांकडून पैसे घेण्यात आले. चव्हाण दाम्पत्याकडूनही ₹२० हजार रोख घेतल्याचा आरोप करण्यात आला.
पीडितांच्या आरोपानुसार, शासनाकडून मिळणारे अनुदान हे संबंधितांच्या प्रयत्नांमुळे मिळत असल्याचे सांगून पैशांची मागणी करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास अनुदान बंद करणे, बँक खाते गोठवणे किंवा भविष्यात शासकीय योजनांचा लाभ मिळू न देण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला.
तक्रारदारांनी पुढे सांगितले की, पैसे परत मागितल्यानंतर संबंधितांकडून शिवीगाळ करण्यात आली आणि “एक रुपयाही परत देणार नाही, जे करायचे ते करा” असे सांगण्यात आले. पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची तसेच कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी दिल्याचाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या प्रकरणी २६ जुलै २०२६ रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे तक्रारदारांनी सांगितले. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा दावा करत आपण भयभीत वातावरणात राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फसवणुकीची रक्कम परत मिळवून द्यावी आणि पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला विनोद चव्हाण, बापू बागुल, गौतम पगारे, शबनम चौरे, रजनी चौरे, योगिता चव्हाण, नगीना भोसले, अनुसया भोसले, गंगोत्री चव्हाण, सारिका चौरे, ज्योती चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला तक्रारदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
