गिरणा धरणातून पुराचे पाणी सोडण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरण ९४.२९ टक्के भरले; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता
शैलेश गुरव, जळगांव ग्रामीण( प्रतिनिधी )
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणातून पुराचे अतिरिक्त पाणी कोणत्याही क्षणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग, पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिनांक ३० जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पूर्वसूचनेनुसार, गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता धरणात २०४४३ दलघफु (९४.२९ टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे.
अतिवृष्टीमुळे पाण्याची आवक वाढण्याची शक्यता
मुंबई वेधशाळा हवामान विभागाने ३० व ३१ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रात पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास धरणातील पाण्याची आवक वाढून गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
धरणाची सुरक्षितता लक्षात घेता आवश्यकतेनुसार द्वारसंचालन करून अतिरिक्त पुराचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या नागरिकांना आवाहन
जलसंपदा विभागाने गिरणा नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये.
-
नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे.
-
ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
-
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांना त्यांच्या अधिनस्त यंत्रणांना पूर्वसूचना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
