जागतिक व्याघ्र दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे व्याघ्र संवर्धनाचा जागर
विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणाचा संदेश; ‘वाघ वाचला तर जंगल वाचेल’चा दिला प्रेरणादायी संदेश
नशिराबाद | प्रतिनिधी :
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाघांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संरक्षण, अधिवास संवर्धन तसेच जैवविविधतेतील वाघांची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धनाची गरज आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच जंगल आणि निसर्गाचे संरक्षण करणे, वन्यजीवांविषयी आदराची भावना निर्माण करणे आणि वन्यजीवांबाबतच्या अफवा व अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, प्रत्येक नागरिकाने पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग घेतल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध जैवविविधता जतन करता येईल.
या कार्यक्रमास नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. योगेश पाटील, मुख्याध्यापक एस. ए. बनसोडे, तसेच सौ. सीमा पाटील, सौ. जयश्री पगारे, सौ. वंदना खाचने, सौ. सोनल नारखेडे, सौ. एन. एम. चौधरी, श्रीमती सुचिता वासनिक, श्री. जी. टी. पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी श्री. माधव चौधरी आणि श्री. नरेंद्र धर्माधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन वन्यजीव रक्षक भूषण दळवी, अजय कोळी आणि मंगल कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी “वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
