भारतीय हॉकी संघाच्या ‘केसरिया’ जर्सीवरून वाद; हॉकी इंडियाने दिले स्पष्टीकरण
निळ्या जर्सीऐवजी केसरिया रंगाची निवड तांत्रिक कारणांसाठी; राजकीय हेतू नसल्याचे हॉकी इंडियाचे स्पष्टिकरण
नवी दिल्ली | प्रतिनिधी :
भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलण्यावरून सध्या क्रीडा क्षेत्रात चर्चा रंगली आहे. पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी संघासाठी केसरिया (भगवा) रंगाची जर्सी निवडण्यात आल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने अधिकृत स्पष्टीकरण देत हा निर्णय कोणत्याही राजकीय किंवा गैर-खेळ कारणांमुळे घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हॉकी इंडियाच्या माहितीनुसार, जर्सीच्या रंगातील बदल हा पूर्णपणे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या सूचनांनुसार तसेच मैदानावरील तांत्रिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आला आहे.
निळ्या टर्फवर निळी जर्सी दिसण्यात अडचण
हॉकी इंडियाने सांगितले की, सध्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय मैदानांवरील निळ्या सिंथेटिक टर्फवर निळ्या रंगाची जर्सी खेळाडूंना आणि प्रेक्षकांना स्पष्टपणे ओळखण्यात अडचणीची ठरत होती. सामन्यादरम्यान खेळाडूंची सहज ओळख पटावी आणि खेळाची दृश्यता सुधारावी यासाठी वेगळ्या रंगाची निवड करण्यात आली.
केसरिया रंगाचे महत्त्व
हॉकी इंडियाने स्पष्ट केले की, केसरिया रंग हा भारतीय तिरंग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा रंग साहस, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे खेळाच्या गरजेनुसार आणि दृश्य स्पष्टतेसाठी या रंगाचा वापर करण्यात आला आहे.
संघाच्या किटमध्ये वेळोवेळी तांत्रिक गरजेनुसार बदल केले जातात आणि हा बदल त्याच प्रक्रियेचा एक भाग असल्याचेही हॉकी इंडियाने सांगितले.
माजी कर्णधाराने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार विरेन रासकिन्हा यांनी या बदलावर प्रश्न उपस्थित केला आहे. नवीन केसरिया जर्सीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत हा बदल “शर्मनाक” असल्याचे म्हटले आहे.
जर्सीच्या रंग बदलामुळे आता क्रीडा क्षेत्रात आणि सोशल मीडियावर चर्चांना वेग आला असून, आगामी सामन्यांमध्ये या नव्या जर्सीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
