धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस; जिल्हा रुग्णालयासह शासकीय कार्यालयांमध्ये पाणी, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
पांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ; शहरातील अनेक रस्ते जलमय, प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
धुळे | प्रतिनिधी :
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार धुळे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग सुमारे १४ तास सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस ठाण्यासह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुसळधार पावसामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांना पाण्यातून वाट काढत रुग्णालयात ये-जा करावी लागली. तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या आवारातही पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला.
रस्त्यांना तलावाचे स्वरूप
धुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. काही ठिकाणी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात अडकल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ
सततच्या पावसामुळे पांजरा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीकाठच्या भागांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले असून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
अतिवृष्टीचा इशारा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने ३० आणि ३१ जुलै रोजी धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पुढील काही तासही मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
