जिल्ह्यात मुसळधार पावसाची पार्श्वभूमी; नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
प्रशासनाला २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश; शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे तसेच लहान पुलांवरील पाण्याची पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना २४ तास सज्ज राहून आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले आहेत.
पालकमंत्री म्हणाले की, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे. पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल, नदी-नाले किंवा ओढे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी बांधवांनी शेतात काम करताना विशेष दक्षता घ्यावी. तुटलेल्या वीजवाहिन्या, वीजेचे खांब, पाण्याने वेढलेली ठिकाणे आणि धोकादायक परिसरापासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच सर्व संबंधित विभागांना सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
“संयम, सतर्कता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज असून प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाची आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
