मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेचे आवार जलमय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रोटवद येथील शाळेत पाणी साचल्याने ये-जा धोकादायक; तातडीने निचऱ्याची उपाययोजना करण्याची पालक व ग्रामस्थांची मागणी
रोटवद | प्रतिनिधी (प्रशांत शिंदे)
धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोटवद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळेत प्रवेश करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शाळेच्या आवारात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा अत्यंत धोकादायक बनली आहे. विशेषतः प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढण्याची शक्यता असून डासांची उत्पत्ती, दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक व पालकांनी संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन शाळेच्या परिसरातील पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
