पालकांनी जागृत होण्याचे एस.एम. नागपुरे यांचे आवाहन; क्रीडा शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन भरतीतील विलंबावर तीव्र नाराजी, बेरोजगार युवक आंदोलनाचा इशारा
नागपूर | शंकर नागपुरे, प्रतिनिधी
राज्यात निवडणुका वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडतात, मात्र क्रीडा शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची भरती वर्षानुवर्षे रखडत असल्याचा आरोप करत कृती समितीचे राज्याध्यक्ष एस.एम. नागपुरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात क्रीडा शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, हा सुशिक्षित बेरोजगारांवरील अन्याय असल्याचे म्हटले आहे.
नागपुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होते, परंतु राज्याचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या भरतीबाबत सरकारकडून सातत्याने विलंब केला जात आहे. त्यामुळे हजारो पात्र उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी त्यांनी पालकांनाही थेट आवाहन करत म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे. शिक्षकांची कमतरता कायम राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय नेत्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आता आली असून, “निवडणुका वेळेत होतात तर शिक्षक भरती वेळेत का होत नाही?” हा प्रश्न प्रत्येक पालकाने आपल्या लोकप्रतिनिधींना विचारावा, असे आवाहन नागपुरे यांनी केले.
क्रीडा शिक्षकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ‘खेळो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’सारख्या योजनांचा उल्लेख करत, एका बाजूला क्रीडेला प्रोत्साहन देण्याची भाषा केली जाते, तर दुसरीकडे बी.पी.एड. आणि एम.पी.एड. पात्रताधारक उमेदवारांना भरती प्रक्रियेत संधी दिली जात नसल्याचा आरोप केला. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होऊनही हजारो क्रीडा शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या भरतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ११ वी आणि १२ वीच्या वर्गांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांनाही पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत स्थान मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. सरकारकडून “अभ्यास सुरू आहे”, “लवकर निर्णय होईल” अशा स्वरूपाची आश्वासने वारंवार दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात भरतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे नागपुरे म्हणाले.
यापुढेही क्रीडा शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या भरतीबाबत तातडीने निर्णय घेतला गेला नाही, तर बेरोजगार युवक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील आणि आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मतदानातून नाराजी व्यक्त करतील, असा इशाराही कृती समितीचे राज्याध्यक्ष एस.एम. नागपुरे यांनी दिला.
