भालोद कला व विज्ञान महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; विद्यार्थ्यांना विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन
भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे) :
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही केवळ कादंबरी नसून संघर्ष, स्वाभिमान आणि आत्मबळाची जिवंत शाळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फकिरा ही कादंबरी आवर्जून वाचावी. ही साहित्यकृती जीवनाचा खरा अर्थ, स्वाभिमानाचे महत्त्व आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. फकिरा मनामध्ये आत्मविश्वास आणि आत्मबळ जागवणारी साहित्यकृती आहे,” असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतिनकुमार मेढे यांनी केले.
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले. “अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांना संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा देते, तर लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि कणखर व्यक्तिमत्त्व प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास जीवन अधिक मूल्याधिष्ठित आणि यशस्वी होईल,” असे त्यांनी सांगितले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बहिणाबाई अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिकेश माळी, धीरज भालेराव, मुकेश भालेराव, सचिन पाटील, मोहित नेहते, जीवन भालेराव, विजय भालेराव, रूपम कोळी, कुणाल कोळी, अजय भालेराव, अभय सपकाळ, अजय पाटील, करिश्मा कोळी, पल्लवी कोळी, प्रियंका कोळी आणि आशुतोष भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील वाटा आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.
