मुसळधार पावसामुळे वीजवाहिनीचे पोल कोसळले; महावितरणच्या तत्पर कारवाईने अल्पावधीत वीजपुरवठा पूर्ववत
जळगाव खुर्द | प्रतिनिधी (शैलेश गुरव):
परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव खुर्द येथे ११ केव्ही वीजवाहिनीचे पोल कोसळल्याने जळगाव खुर्द व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण करत अल्पावधीतच वीजपुरवठा सुरळीत केला. पोल कोसळल्याची माहिती मिळताच नशिराबाद ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र परदेशी, सचिन सोनवणे, साक्षी पाटील, दीक्षा बोरोले आणि प्रभाकर महाजन यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या पथकाने युद्धपातळीवर काम करत पडलेले ११ केव्हीचे पोल पुन्हा उभे केले. त्यानंतर वीजवाहिनीची आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परता, समन्वय आणि कार्यतत्परतेमुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ अंधाराचा सामना करावा लागला नाही. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल जळगाव खुर्द व खिर्डी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
