अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या धाडसी मोहिमेला यश; दोर, जॅकेट व मानवी साखळीच्या मदतीने संपूर्ण कुटुंब सुरक्षितस्थळी
परोळा । सुरेश पाटोळे| प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या पुरामुळे एका घरात अडकलेल्या अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंबाची अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली. या धाडसी बचाव मोहिमेचे शहरभर कौतुक होत आहे.
मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनी परिसरातील नाल्याला अचानक पूर आला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, अनेक घरांमध्ये छातीपर्यंत पाणी साचले. एका घरात एक महिन्याचे बाळ, त्याची आई, तीन लहान मुले, महिला आणि कुटुंबातील इतर सदस्य अडकले होते. घरात पाणी शिरल्याने त्यांनी पलंग व उंच जागेवर उभे राहून जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने बचाव पथक रवाना केले. आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदानशीव आणि पवन बिऱ्हाडे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने सुरुवातीला घरापर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. त्यानंतर दोर आणि लाइफ जॅकेटची व्यवस्था करून मानवी साखळी तयार करण्यात आली. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने अडकलेल्या कुटुंबापर्यंत मजल मारली.
विशेष म्हणजे, अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला प्लास्टिकच्या टबमध्ये अलगद ठेवून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आईसह तीन महिला, तीन लहान मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या धाडसी आणि वेळेवर पार पडलेल्या बचाव मोहिमेमुळे मोठी दुर्घटना टळली. जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अमळनेर शहरासह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून त्यांच्या कार्याला सलाम केला जात आहे.
