भारत विकास परिषद पाचोरा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
अध्यक्षपदी डॉ. संजय जाधव, सचिवपदी गोकुळ सोनार; सेवा, संस्कार व पर्यावरण उपक्रमांवर भर
पाचोरा | प्रतिनिधी :
‘समाजकार्यातून राष्ट्रनिर्माण’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या भारत विकास परिषद, पाचोरा शाखेच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शाखेच्या कार्याला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने रविवारी रात्री आयोजित विशेष ऑनलाइन बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
बैठकीला भारत विकास परिषदेचे प्रांत सचिव राजेंद्र जाखडी (धुळे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाखेच्या आगामी वर्षातील सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभिमुख उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी
-
अध्यक्ष: डॉ. संजय जाधव
-
उपाध्यक्ष: डॉ. राहुल झेरवाल
-
सचिव: गोकुळ सोनार
-
महिला सहभागिता समन्वयक: पूजा तांबोळी
-
संस्कार समन्वयक: कमलेश सोनवणे
बैठकीस प्रांत सचिव राजेंद्र जाखडी, डॉ. पंकज हरणे, सतीश जाधव यांच्यासह शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी पाचोरा शहरात भारत विकास परिषदेचे विचार व कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संस्कार, सेवा, संपर्क आणि पर्यावरण या चार प्रमुख गतिविधींवर आधारित विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पाचोरा शाखेला प्रांतातील आदर्श शाखा म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.
