म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात
महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन; अभिवादन कार्यक्रमात शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
भुसावळ | प्रतिनिधी
नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व आदरांजली कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस, तर सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी सरला सावकारे, संध्या धांडे, डॉ. प्रदीप साखरे आणि संजीव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा परिचय करून दिला. तसेच श्रमिक, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्व, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या घोषणेचे ऐतिहासिक महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे हे समाजजागृती करणारे क्रांतिकारी साहित्यिक असून लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात त्यांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, वरिष्ठ लिपिक प्रविण चौधरी, ग्रंथपाल अरुण नेटके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले, तर पुनम देवकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डी. के. भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल आणि रोहन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
