दोंडाईचा पोलिसांची संवेदनशील कामगिरी; अवघ्या २४ तासांत हरविलेल्या चार वर्षीय चिमुकलीला कुटुंबाशी केले एकत्र
सीसीटीव्ही तपास, सोशल मीडियाचा वापर आणि आदिवासी भाषेतील संवादामुळे राधाची आईपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश
दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा शहरात हरविलेल्या अवघ्या चार वर्षीय चिमुकलीला अवघ्या २४ तासांच्या आत तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून दोंडाईचा पोलिसांनी संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यदक्षतेचा उत्कृष्ट परिचय दिला. पोलिसांच्या या मानवी दृष्टिकोनामुळे एका निष्पाप बालिकेला तिच्या आई-वडिलांपासून कायमचे दूर होण्यापासून वाचविण्यात यश आले.
३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दोंडाईचा शहरातील मोनाली चौफुली परिसरात एक चार वर्षीय चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत एकटीच रडत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवून त्या चिमुकलीला सुरक्षित ताब्यात घेतले. याबाबत धुळेचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही माहिती देऊन आवश्यक मार्गदर्शन घेण्यात आले.
चिमुकली अत्यंत घाबरलेली असल्याने सुरुवातीला ती कोणतीही माहिती स्पष्टपणे देऊ शकत नव्हती. पोलिसांनी तिला धीर देत विश्वासात घेतले असता तिने आदिवासी बोलीभाषेत तोडक्या-मोडक्या शब्दांत स्वतःचे नाव “राधा” असल्याचे सांगितले. त्यावरून ती आदिवासी समाजातील असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.
यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच चिमुकलीचा फोटो विविध व्हॉट्सअॅप गटांवर प्रसारित करून तिच्या पालकांचा शोध सुरू केला. संपूर्ण रात्र शोधमोहीम राबवूनही कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन चिमुकलीचा फोटो दाखवत ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यावेळी एका महिलेने फोटो पाहताच ती तिचीच मुलगी असल्याचे सांगितले. मात्र ती आदिवासी भाषेत बोलत असल्याने संवाद साधणे कठीण जात होते. अशावेळी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी स्वतः आदिवासी भाषेत संवाद साधून महिलेची माहिती पडताळली.
महिलेने स्वतःचे नाव सुनिताबाई प्रविण भिल (रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) असे सांगत हरविलेली चिमुकली ही तिची मुलगी राधा प्रविण भिल (वय ४) असल्याचे स्पष्ट केले. ३१ जुलै रोजी सायंकाळी मांडळ चौफुली परिसरातून घरी जात असताना राधा अचानक बेपत्ता झाल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सर्व खातरजमा करून राधाला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांच्या चिंतेनंतर मुलगी सुखरूप परत मिळाल्याने आई सुनिताबाई आणि चिमुकली राधा दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. उपस्थित नागरिकांनाही हा भावनिक क्षण पाहून समाधान वाटले.
ही उल्लेखनीय कामगिरी धुळेचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोउनि इमरान खान, पोलीस अंमलदार हिरालाल सूर्यवंशी, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे आणि पूजा अहिरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
