खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ पाटीवर आता कडक कारवाई; राज्यभरातील पोलीसांना निर्देश
खासगी वाहनांवर लाल रंगातील ‘पोलीस’ पाटी वापरणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होणार
प्रतिनिधी : हर्षल पाटील
राज्यात खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल रंगाची ‘पोलीस’ पाटी लावून अथवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ असा उल्लेख करून वाहने चालवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर निर्णय
राज्यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नाव किंवा लाल रंगाची पाटी लावून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले होते. अशा वाहनांची नाकाबंदी किंवा तपासणीदरम्यान अनेकदा तपासणी टाळली जात असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
याप्रकरणी सखाराम कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत वाहतूक विभागाने संबंधित परिपत्रक जारी करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या कायद्यांनुसार होणार कारवाई
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी किंवा तत्सम ओळख वापरल्याचे आढळल्यास खालील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
-
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६)
-
मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १७७
या संदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक (मुख्यालय) डॉ. सुनील भारद्वाज यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि महामार्ग पोलीस परिक्षेत्रांना पाठविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
