धुळे शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;
दरोडा २ तासांत तर घरफोडी २४ तासांत उघड, ७ आरोपी ताब्यात
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहर पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्यात वेगवान कामगिरी करत दरोड्याचा गुन्हा अवघ्या २ तासांत आणि घरफोडीचा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला. या कारवाईत दोन स्वतंत्र गुन्ह्यांतील २ सज्ञान आरोपी आणि ५ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोड्याचा गुन्हा दोन तासांत उघड
२७ जुलै २०२६ रोजी रात्री रामनगर परिसरातील युगराज ड्रीम पॅलेसच्या मागील भागात प्रसाद चंद्रकांत सरदार (वय १९) यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील १० हजार रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 310(2) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने कारवाई करत सनी साहेबराव सोनवणे (१८), मोहित महेंद्र ठाकुर (२१) आणि तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घरफोडीचा गुन्हाही २४ तासांत निष्पन्न
२८ जुलै रोजी साक्री रोडवरील कृषीनगर परिसरात रत्नाबाई युवराज हालोरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, तांबे-पितळाची भांडी आणि सायकल चोरी केली होती. याप्रकरणी BNS कलम 331(3) व 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घोंगडे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
