अतिवृष्टीग्रस्त भिल्ल वस्तीला दिलासा; विजय भाऊ सोनवणे यांच्याकडून संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात; ग्रामस्थांकडून सामाजिक उपक्रमाचे स्वागत
ममूराबाद | प्रतिनिधी
ममूराबाद गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे भिल्ल वस्तीतील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, घरांची पडझड, अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तूंची नासधूस झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटाच्या काळात सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ सोनवणे यांनी पुढाकार घेत आपत्तीग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी वस्तूंचे किट वाटप करून दिलासा दिला.
मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका भिल्ल वस्तीला बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक साहित्य वाहून गेले, तर काही घरांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीची दखल घेत विजय भाऊ सोनवणे यांनी तातडीने मदतीचा उपक्रम राबवत गरजू कुटुंबांपर्यंत आवश्यक वस्तूंचे किट पोहोचविले.
वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध संसारोपयोगी वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना नव्याने संसार उभा करण्यासाठी मोठा आधार मिळाला. संकटाच्या काळात समाजाने समाजासाठी धावून जाण्याचा आदर्श या उपक्रमातून पाहायला मिळाला.
यावेळी गावचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गोपालभाऊ मोरे, निखिल भाऊ पाटील, आशा सेविका लक्ष्मी आत्या यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विजय भाऊ सोनवणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना विजय भाऊ सोनवणे म्हणाले, “नैसर्गिक आपत्ती टाळणे आपल्या हातात नसले तरी संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीचा हात देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ही मदत मोठी नसली तरी संकटग्रस्त कुटुंबांना धीर देण्याचा आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजाच्या सुख-दुःखात आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू.”
या मदत उपक्रमाबद्दल भिल्ल वस्तीतील नागरिकांनी विजय भाऊ सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रशासकीय मदतीबरोबरच सामाजिक स्तरावरही अशा प्रकारचे मदतीचे उपक्रम राबविले गेल्यास आपत्तीग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
