धुळे पोलीस दलात खळबळ; ₹४० हजारांची लाच स्वीकारताना पीएसआयसह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
कोर्टात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ₹५० हजारांची मागणी; तडजोडीनंतर ₹४० हजार स्वीकारताना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात रंगेहात कारवाई
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला ₹४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गृहकर्जाशी संबंधित एका प्रकरणात तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या बाजूने आरोपीविरुद्ध न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी ₹५० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹४० हजारांवर निश्चित करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहात अटक केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (वय ३६) आणि पोलीस कर्मचारी अविनाश अरविंद सादरे (वय ३१) यांना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्याच्या परिसरातच ही कारवाई झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पोलीस दलाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे आणि पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील आणि मकरंद पाटील यांचा समावेश असलेल्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या घटनेनंतर पोलीस दलात भ्रष्टाचाराविरोधात अधिक कठोर कारवाईची गरज असल्याची चर्चा सुरू झाली असून, एसीबीच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
