पाडवी नूतन विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव
धुळे | प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चि. फ. आर. आर. पाडवी नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के. जी. गर्दे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षिका सौ. पी. व्ही. पाटील, ज्येष्ठ शिक्षक जे. जी. बागुल यांच्यासह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक जे. जी. बागुल आणि प्रमुख वक्ते संदीप शेलार यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याला चालना देण्यासाठी इयत्ता ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १२ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रमुख वक्ते संदीप शेलार यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रप्रेम, सामाजिक कार्य आणि साहित्यिक योगदानाचा प्रेरणादायी आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला.
स्पर्धेचा निकाल बी. सी. पाटील यांनी जाहीर केला. पहिल्या गटात आनंद चौरे प्रथम, तर प्रेमल नाईक द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. दुसऱ्या गटात उमेश गर्दे प्रथम, तर कार्तिक गवळे द्वितीय आले. तिसऱ्या गटात मनलेश ठाकरे यांनी प्रथम, तर चंदन वळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
विजेत्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका सौ. सोनाली ठाकरे यांच्या वतीने पेन भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य के. जी. गर्दे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करून समाजसेवा, शिक्षण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून विजेत्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. सी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सोनाली ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
