पारोळ्यात ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे ‘दहा कोटी नशामुक्त भारत संकल्प अभियान’चा शुभारंभ
व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती; मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी घेतला नशामुक्त भारताचा संकल्प
पारोळा | प्रतिनिधी (संदीप पाटील)
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारोळा यांच्या वतीने ‘दहा कोटी नशामुक्त भारत संकल्प अभियान’ उत्साहात प्रारंभ करण्यात आला. समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून निरोगी, सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, उपनगराध्यक्ष रोहन दादा मोरे, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाऊ अनुष्ठान तसेच नगरसेवक मनीषभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्त समाजाची आवश्यकता अधोरेखित करत युवकांनी नशेपासून दूर राहून सुदृढ, सकारात्मक आणि संस्कारक्षम जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करत समाजातील प्रत्येक घटकाने या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचा सामूहिक संकल्प केला. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
