धरणगाव तालुक्याच्या विकासाला गती; जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा
उपजिल्हा रुग्णालय, एमआयडीसी, रिंग रोड, पूल व रस्त्यांसह विविध विकासकामांवर भर
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि मान्यवरांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेत विविध विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला.
या बैठकीत धरणगाव तालुका आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी अनेक विकासकामे सुरू असून काही प्रकल्प प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली.
धरणगाव येथे नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेले उपजिल्हा रुग्णालय लवकरच साकार होणार असून, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना उपचारांसाठी जळगाव किंवा खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
धरणगाव तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून, जांभोरा परिसरात आवश्यक जमीन उपलब्ध झाल्यास उद्योगनगरी उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येईल. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय बालकवी ठोंबरे स्मारक, धरणगाव शहरासाठी नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन, क्रीडा संकुल ते डॉ. हेडगेवार नगर रस्ता, शहरातील काँक्रीट रस्ते, तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदारांना दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
बैठकीत असोदा उड्डाणपूल, भोकरदन पूल, निमखेडा पूल, मसावद उड्डाणपूल, मोहाडी येथील रुग्णालय, बहिणाबाई वारकरी भवन, तसेच जळगाव-भोकरदन, असोदा-भादली आणि अन्य महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. जळगाव शहरासाठी प्रस्तावित रिंग रोड आणि सुमारे ₹५५० कोटींच्या विकास आराखड्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
या शिष्टमंडळात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र चव्हाण, शेतकी संघाचे अध्यक्ष गजानन पाटील, व्यापारी सेनेचे निलेश मुसळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
