महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार–२०२६’ने प्रकाश विजयसिंग दाभाडे यांचा गौरव
शरीरसौष्ठव, युवक विकास व समाजसेवा क्षेत्रातील २५ वर्षांच्या योगदानाची राज्यस्तरीय दखल
धुळे | प्रतिनिधी
धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन (DDBBFF)चे अध्यक्ष तथा IBBFFचे राष्ट्रीय पंच इंजि. प्रकाश विजयसिंग दाभाडे यांना शरीरसौष्ठव, युवक विकास आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
दैनिक लोक युवा वृत्तपत्र यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सोहळा दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी शेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
गेल्या सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ प्रकाश दाभाडे यांनी शरीरसौष्ठव क्षेत्रात कार्यरत राहून अनेक खेळाडूंना घडविण्याचे कार्य केले आहे. ग्रामीण भागातील होतकरू युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, त्यांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा देणे, तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणे, या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धुळे येथे धुळे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन (DDBBFF) ची स्थापना करून त्यांनी शेकडो खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. गरीब व होतकरू शरीरसौष्ठवपटूंना मोफत मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक ते सहकार्य देत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले आहेत.
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सौ. धनश्रीताई खाटीकर (अध्यक्ष, मराठी-हिंदी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी, अमोल अंधारे, चंद्रकांत घोराळे, बाळासाहेब दामोदर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश दाभाडे यांच्या या सन्मानाबद्दल धुळे जिल्ह्यातील क्रीडा, व्यायामशाळा, शरीरसौष्ठव क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडू तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे धुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
