कासोद्यात निंबोळ्यांच्या बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ;
पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम, ट्रिगार्डला ₹१० हजारांची मदत
कासोदा (ता. एरंडोल) | प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने कासोदा येथे सुमारे तीन क्विंटल निंबोळ्यांच्या बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते बुधवारी (दि. ५) करण्यात आला. यावेळी ट्रिगार्ड संस्थेसाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा पाटील होत्या. यावेळी पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सरपंच पुरुषोत्तम चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, धिरेन कालरिया व कृष्णपाल सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कासोदा–पारोळा मार्गावरील साईबाबा मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या उन्हाळ्यात संकलित करून वाळवून ठेवलेल्या सुमारे तीन क्विंटल निंबोळ्यांचे बीजारोपण चांगला पाऊस झाल्यानंतर सुरू करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत कासोदा ते मालखेडा, आडगाव, अंतुर्ली आणि वनकोठा या चारही दिशांना जाणाऱ्या सुमारे २० ते २५ किलोमीटर परिसरात निंबोळ्यांचे बीजारोपण करण्यात येत आहे. भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणावर निंबाच्या झाडांची वाढ होऊन पर्यावरण संतुलनास हातभार लागणार आहे.
यावेळी मनीषकुमार गायकवाड, संदीप पाटील, श्रीकांत पाटील, समाधान पाटील आणि महानंदा पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षलागवड आणि बीजारोपण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
गेल्या उन्हाळ्यात रोपांना पाणी देऊन त्यांचे संगोपन करणाऱ्या संदीप वाघ आणि प्रवीण पाटील यांचा प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालखेड्याचे सरपंच सचिन पाटील, सुरेश सूर्यवंशी, महेश पांडे, उमेश पाटील, गौरव पाटील, गोपाल पांडे, प्रितम पटेल, प्रल्हाद पाटील, प्रवीण पाटील, उमेश नवाल तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हभप संजय जमादार यांनी तर आभार प्रदर्शन सूर्यकांत पाटील यांनी केले.
