‘मंत्र्यांची कुवत बघून खाते द्या; पवित्र पोर्टल सांभाळण्यास परीक्षा परिषद अक्षम!’
एस. एम. नागपुरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ३० हजार शिक्षक भरतीतील तांत्रिक गोंधळावर संताप
नागपूर | विशेष प्रतिनिधी : शंकर नागपुरे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींवरून कृती समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष एस. एम. नागपुरे यांनी राज्य सरकार, शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर तीव्र टीका केली आहे. “मुख्यमंत्री महोदय, एखाद्या मंत्र्याला मंत्रालय सोपवताना आधी त्यांची कुवत आणि क्षमता तपासून पहा. सध्या शिक्षण मंत्री ‘लापता’ असून संपूर्ण शिक्षण खाते वाऱ्यावर सोडण्यात आले आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
‘अधिकाऱ्यांचीच आधी परीक्षा घ्या’
पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाही तांत्रिक अडचणी कायम असल्याचे नागपुरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पवित्र पोर्टल हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा आरोप करत त्यांनी “उमेदवारांची परीक्षा घेण्यापूर्वी परीक्षा परिषदेतील अधिकारी वर्गाचीच परीक्षा घ्यावी,” अशी उपरोधिक टीका केली.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही यंत्रणा सुरळीतपणे चालवता येत नसेल, तर संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेदवारांच्या शांततेवरही नागपुरेंची टीका
पवित्र पोर्टलच्या अडचणींवरून नागपुरे यांनी उमेदवारांनाही लक्ष्य केले. बिहार आणि झारखंडमधील तरुण अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरतात, मात्र महाराष्ट्रातील सुशिक्षित उमेदवार आपल्या हक्कांसाठी अपेक्षित आक्रमकता दाखवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“स्वतःच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी उमेदवार राजकीय पक्षांचे मानसिक गुलाम झाल्यासारखे भासत आहेत. अन्याय सहन करून घरात बसण्याच्या वृत्तीमुळेच सरकार उमेदवारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही,” असा दावा नागपुरे यांनी केला.
‘प्राधान्यक्रम भरून देतो’ म्हणत पैसे उकळण्याचा आरोप
गेल्या १५ महिन्यांपासून भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने उमेदवार मानसिक तणावाखाली असल्याचे सांगत नागपुरे यांनी काही संघटनांच्या कथित कारभारावरही गंभीर आरोप केले. पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम भरण्याबाबत उमेदवारांच्या अडचणींचा गैरफायदा घेत “प्राधान्यक्रम अचूक भरून देतो” असे सांगून काही स्वयंघोषित नेते उमेदवारांकडून पैसे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संकटाच्या काळात उमेदवारांना मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्याऐवजी आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागपुरे यांनी म्हटले.
३० हजार शिक्षक भरतीचा तिढा तातडीने सोडवा
गेल्या १५ महिन्यांपासून रखडलेल्या सुमारे ३० हजार शिक्षक भरती प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करून उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी एस. एम. नागपुरे यांनी केली आहे. प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
