महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘शून्य सर्पदंश’ अभियान
सर्पदंश प्रथमोपचार, विषारी-बिनविषारी सापांची माहिती; ‘सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र’ – प्रदीप शेळके
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूल येथे वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शून्य सर्पदंश’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची प्रथमोपचाराची काळजी तसेच सापांबाबतच्या अंधश्रद्धांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एम. बी. मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वन्यजीव संरक्षण संस्था, जळगावचे सचिव प्रदीप शेळके, सदस्य राजेश सोनवणे, हेमराज सपकाळे, तसेच सर्पमित्र निलेश चौधरी, रामलाल बोरसे आणि गणेश गुरव उपस्थित होते. मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नाग, मण्यार, फुरसे यांची विद्यार्थ्यांना माहिती
यावेळी हेमराज सपकाळे यांनी नाग, मण्यार आणि फुरसे या प्रमुख विषारी सापांची ओळख, त्यांचे वास्तव्य आणि त्यांच्यापासून घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राजेश सोनवणे यांनी विविध बिनविषारी सापांची माहिती देत सापांबाबत समाजात असलेल्या गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहन केले.
सर्पमित्र निलेश चौधरी, रामलाल बोरसे आणि गणेश गुरव यांनी प्रत्यक्ष सर्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सापांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. साप पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून, विशेषतः शेतीसाठी त्याचे महत्त्व मोठे आहे. ‘सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे; त्यामुळे सापांना मारण्याऐवजी त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे,’ असे त्यांनी सांगितले.
सर्पदंशानंतर प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक
वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव प्रदीप शेळके यांनी सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, रुग्णाला कशा पद्धतीने सुरक्षितपणे रुग्णालयात न्यावे आणि कोणत्या चुकीच्या उपचारांपासून दूर राहावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रथमोपचाराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) करून दाखविले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सर्पांशी संबंधित विविध प्रश्न विचारले. उपस्थित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
सर्पमित्रांच्या हस्ते वृक्षारोपण
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या मैदानात सर्पमित्रांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर एच. डी. माळी यांनी आभार मानले. वन्यजीव संरक्षण, सर्पसंवर्धन आणि सर्पदंशाबाबत योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने हा जनजागृती उपक्रम उपयुक्त ठरला.
