कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला
स्वातंत्र्यदिनी पाणीप्रश्नावर महिलांचा आक्रमक पवित्रा; किमान सहा दिवसांआड स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी
जगदीश सपकाळे | जळगाव तालुका प्रतिनिधी |
तालुक्यातील कुसुंबा येथे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातही मिळणारे पाणी दूषित असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
कुसुंबा ग्रामपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. १५ दिवसांनी एकदा पाणी मिळत असल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले. त्यातच उपलब्ध होणारे पाणी दूषित असल्याचा आरोप करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार तक्रारी करूनही दखल नाही
पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचा आरोप महिलांनी केला. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको केला.
आंदोलनकर्त्या महिलांनी किमान सहा दिवसांआड नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून, ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने संताप
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनी पाणीप्रश्नावर महिलांचे आंदोलन सुरू असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलांचा संताप आणखी वाढला. “समस्या मांडण्यासाठी निवेदन कोणाकडे द्यायचे?” असा सवाल करीत आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्तारोको मागे
रास्तारोकोमुळे अजिंठा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर महिलांनी रास्तारोको मागे घेतला आणि महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.
दरम्यान, कुसुंब्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
