निभोरा पोलिसांकडून मोटारसायलक चोरीचा गुन्हा उखडकीस
खर्डी बुद्रुक येथून चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी केली हस्तगत
वाघोदा तालुका रावेर प्रतिनिधी अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील खर्डी बुद्रुक येथील हॉटेल व्यावसायिकाची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा निभोरा पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चोरीला गेलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल हस्तगत केली आहे.
खर्डी बुद्रुक येथील रहिवासी तथा हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांनी आपली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (एमएच १९ ईएक्स २६८९) दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरासमोर उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी मोटरसायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी जैस्वाल यांच्या तक्रारीवरून निभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताला ताब्यात घेताच गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत किरण उर्फ गफूर पितांबर कोळी (रा. खर्डी बुद्रुक, ता. रावेर) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेली ७० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल हस्तगत केली.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी, किरण चाटे, सुभाष शिंदे आणि सर्फराज तडवी यांच्या पथकाने तपास करून आरोपीला ताब्यात घेत दुचाकी हस्तगत केली.
आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपी किरण उर्फ गफूर कोळी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
