हज्जन सायरा बानो गर्ल्स उर्दू शाळेत ‘संविधान व मानसिक स्वास्थ्य’ कार्यक्रम
दामिनी पथकाकडून सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन
धुळे प्रतिनिधी :
धुळे शहरातील हज्जन सायरा बानो गर्ल्स उर्दू मीडियम हायस्कूल येथे बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘संविधान व मानसिक स्वास्थ्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पेट्रोलिंगदरम्यान उपस्थित असलेल्या दामिनी पथकाने विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले.
दामिनी पथकाच्या वतीने सायबर क्राइम, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा आणि सायबर बुलिंग यांसारख्या विषयांवर विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली.
सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन
यावेळी विद्यार्थिनींना इंटरनेट किंवा मोबाइलच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. बनावट फोन कॉल, संदेश किंवा संशयास्पद लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची माहिती अथवा अन्य गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले.
सोशल मीडिया वापरताना फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांवर वैयक्तिक माहिती, छायाचित्रे किंवा संवेदनशील तपशील विचारपूर्वक शेअर करण्याचा सल्ला विद्यार्थिनींना देण्यात आला. अनोळखी लिंक किंवा संशयास्पद वेबसाइटवर क्लिक करू नये, असेही सांगण्यात आले.
ऑनलाइन माध्यमातून कोणाला त्रास देणे, धमकावणे किंवा अपमानित करणे म्हणजे सायबर बुलिंग असून, अशा प्रकाराला बळी पडल्यास गप्प न राहता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीला तातडीने माहिती द्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्हा घडल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता कुटुंबीय, शिक्षक किंवा पोलिसांची तातडीने मदत घ्यावी, असा संदेशही विद्यार्थिनींना देण्यात आला.
या कार्यक्रमात मृणालिनी सुनील भावसार यांनी सायबर क्राइम, दामिनी पथकाची भूमिका आणि महिला सुरक्षेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्पीकर – मृणालिनी सुनिल भावसार
(सायबर क्राइम, दामिनी पथक व महिला सुरक्षा)
