महिला बचत गटाच्या सीआरपीला अधिकाऱ्यांकडून त्रास?; कारवाईसाठी महिलेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
दीड वर्षांपासून मानधन प्रलंबित असल्याचा दावा; रेशन दुकान चालविण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप, न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी : महिला बचत गटाच्या सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला तहसील कार्यालयासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिंदखेडा तालुक्यातील एका महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही या महिलेने प्रशासनाला दिला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील निर्मला माळी या साईबाबा महिला बचत गटाशी संबंधित असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून सीआरपी म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, या पदावर काम करूनही गेल्या दीड वर्षापासून मानधन मिळालेले नाही, असा त्यांचा दावा आहे.
मानधन थकीत असल्याने आर्थिक अडचणी
महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी सीआरपी म्हणून काम करणाऱ्या महिलांवर बचत गटांच्या मार्गदर्शनासह विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. निर्मला माळी यांनीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या; मात्र दीर्घकाळ मानधन प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रेशन दुकानासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप
एकीकडे सीआरपी पदाचे मानधन थकीत असताना दुसरीकडे रेशन दुकान चालविण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप निर्मला माळी यांनी केला आहे. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाने या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन
आपल्याला त्रास देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच प्रलंबित मानधन मिळवून द्यावे, अशी मागणी निर्मला माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरम्यान, महिलेने केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील आरोप हे चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असून, संबंधित प्रशासनाची बाजूही समोर येणे अपेक्षित आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, निर्मला माळी आदी उपस्थित होते.
