केंद्राच्या शैक्षणिक धोरणाविरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; पेपरफुटी रोखण्यासह समान शिक्षण व्यवस्था लागू करण्याची मागणी
जळगाव | प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि वंचित घटकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वारडे आणि भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
संविधानाने नागरिकांना दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारावर केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नवीन शैक्षणिक धोरणामुळे गरीब, वंचित आणि बहुजन घटकांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधींवर परिणाम होत असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलनाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन तीन चरणांत करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईची मागणी
आंदोलनादरम्यान NEET पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि राष्ट्रीय परीक्षा समितीच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
समान शिक्षण व्यवस्था लागू करण्याची मागणी
शिक्षण संस्थांचे खासगीकरण थांबवावे, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थीहिताला केंद्रस्थानी ठेवून आवश्यक बदल करावेत आणि देशात समान शिक्षण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय २०११ पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांची TET परीक्षा घेण्याची मागणी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांवर नवीन भरती सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेबाबतही मागणी
आंदोलनकर्त्यांनी EVMच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.
आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, सुनील देहडे, खुशाल सोनवणे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य प्रभारी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, विद्यार्थी समितीचे प्रा. डॉ. एस. एस. राणे, इंजि. डी. एन. पाटील, प्रा. एन. व्ही. भारंबे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले.
तसेच आकाश लोंढे, सुमित भालेराव, मुकेश सावकारे, मयूर तायडे, मनोहर तायडे, विश्वजित तायडे, देवराज भालेराव, सम्यक गायकवाड, स्वप्निल गजरे, रोहन तायडे, राकेश बारेला, संघरत्न बाविस्कर, शुभम अहिरे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. किसन हेरोळे, प्रा. श्रीकांत तायडे, प्रा. चंद्रशेखर अहिरराव, रविंद्र मोरे, कैलास मसाने, रमेश थाटे, त्र्यंबक सोनवणे, अशोक तिडके, सुनील सोनवणे, मनोहर कोचुरे, किशोर तायडे, तबन ह्याळिंगे, अशोक बाविस्कर, आर. बी. परदेशी, भीमराव नन्नवरे, मोरसिंग राठोड, महेंद्र साळवे, ॲड. आनंद कोचुरे, इंजि. दिलीप तासखेडकर, दिलीप इंगळे, डी. एम. भालेराव, प्रभाकर मोरे, देविदास पारधे, मल्हारी सरदार, डॉ. शाकीर शेख, लंकापती भालेराव, अकील कासार, रविंद्र बाविस्कर, किशोर चौधरी, विजय सुरवाडे आदी पालकांचीही उपस्थिती होती.
