जळगावात भीषण अपघात; १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने आयशर पेटवला
कावड यात्रेत सहभागी बालकाला मालवाहू वाहनाची जोरदार धडक; अडीच तासांहून अधिक काळ जळगाव-ममुराबाद मार्ग ठप्प, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० वर्षीय बालकाला किराणा माल घेऊन चोपड्याकडे जाणाऱ्या आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर वाहनाला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यात्रेतून परतताना काळाचा घाला
शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराच्या दिशेने गेली होती. यात्रा आटोपल्यानंतर भाविक परतीच्या मार्गावर असताना जळगावकडून चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या एमएच २०/ईजी ३५९३ क्रमांकाच्या आयशर वाहनाने यात्रेत सहभागी असलेल्या १० वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, वाहनाने मुलाला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला.
संतप्त जमावाने रस्ता अडवला
अपघाताची माहिती मिळताच मृत मुलाचे नातेवाईक, कावड यात्रेतील भाविक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. चालकावर कारवाई होईपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नसल्याची भूमिकाही काही नागरिकांनी घेतली.
संतप्त जमावाने आयशर पेटवला
दरम्यान, जमावातील काही जणांनी किराणा मालाने भरलेल्या आयशर वाहनाला आग लावली. वाहनाने पेट घेतल्याने घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला.
जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनाही किरकोळ धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले.
अडीच तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प
या घटनेमुळे सायंकाळी सुमारे पाच ते साडेसात वाजेपर्यंत जळगाव–ममुराबाद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला.
अपघातानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या दुर्घटनेमुळे कावड यात्रेतील भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
