महावितरणचे धाराशिव मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता संजय आडे निलंबित
कामगिरी समाधानकारक नसल्याने कारवाई; वीजहानी, वीजचोरीवरील कारवाई आणि थकबाकी वसुलीतील प्रलंबित कामांचा ठपका
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणच्या धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय श्रावण आडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. महावितरणच्या प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून २४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. धाराशिव मंडळाच्या कार्यक्षेत्रातील खालावलेली कामगिरी आणि विविध कामांमधील अनियमितता यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वीजहानीत मोठी वाढ
धाराशिव मंडळाच्या कार्यक्षेत्रात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लघुदाब वाहिनीची वितरण व AT&C वीजहानी १९.७८ टक्के होती. मात्र, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतच ती वाढून ३०.३७ टक्क्यांवर पोहोचली. वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने अपेक्षित कामगिरी न झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
१७ हजारांहून अधिक ग्राहकांची पडताळणी प्रलंबित
मंडळाच्या कार्यक्षेत्रात स्वयंचलितपणे वीजपुरवठा खंडित झालेल्या १७,३९८ वीजग्राहकांची पडताळणी प्रलंबित असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापैकी ३९.२ टक्के ग्राहकांची पडताळणी अद्याप बाकी असल्याने ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वीजचोरी रोखण्यात अपयशाचा ठपका
धाराशिव मंडळाला २,४०० वीजचोरी प्रकरणे पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत केवळ ३५९, तर ऑगस्ट २०२६ मध्ये केवळ ४० वीजचोरीची प्रकरणे पकडण्यात आली.
याशिवाय पडताळणी करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी १,१५० ग्राहकांकडून बेकायदेशीर वीजवापर होत असल्याचे आढळून आले. मात्र, यापैकी एकाही प्रकरणात प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल करण्यात आला नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि फीडर ट्रिपिंगमध्ये वाढ
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तुलनेत २०२६-२७ मध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच डीटीसी नादुरुस्तीचे प्रमाणही ५.६८ टक्क्यांवरून ५.७४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले.
धाराशिव मंडळातील औद्योगिक फीडर तसेच ३३ केव्ही तामलवाडी आणि ३३ केव्ही येणेगूर यांसारख्या EHV फीडरवरील ट्रिपिंगचे प्रमाण वाढले असून, याबाबत सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
५००० रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदारांवरही कारवाई अपुरी
५,००० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३४,२१६ ग्राहकांपैकी केवळ १०,३२१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तब्बल २०,७९६ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप सुरू असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईतही अपेक्षित कार्यक्षमता दिसून आली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
निलंबन काळात मुख्यालय सोडण्यास मनाई
महावितरण कंपनी कर्मचारी सेवाविनियम २००५ मधील नियम ८८ (क) व अनुसूची ‘ग’ नुसार संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुख्य अभियंता, परिमंडल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दर सोमवार आणि शुक्रवार या कार्यालयीन दिवशी सकाळी ठीक १० वाजता हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच मुख्य अभियंत्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
