स्थानिक व्यावसायिकांना लळींग टोलमध्ये सूट द्या; ट्रक मालक असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नवीन ठेकेदारामुळे तीन दिवसांपासून स्थानिक वाहनांना टोलमाफी बंद; मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी :
लळींग येथील टोल नाक्यावर स्थानिक व्यावसायिक व २० किलोमीटरच्या परिसरातील वाहनधारकांना टोल आकारणीत पूर्वीप्रमाणे सूट द्यावी, अशी मागणी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन व उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
स्थानिक वाहन व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात टोल आकारणी होत असल्याने वाहतूक व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. स्थानिक वाहनधारकांना टोलमधून सूट मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नवीन ठेकेदारामुळे सूट बंद झाल्याचा आरोप
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २००९ पासून लळींग टोल नाक्यावर स्थानिक तसेच जिल्ह्यातील व्यापारी व व्यावसायिक वाहनांना टोल आकारणीत सूट मिळत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन ठेकेदार नियुक्त केल्यानंतर स्थानिक वाहनांना मिळणारी सूट बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे स्थानिक वाहनचालक व मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, पूर्वीची टोलसवलत तातडीने लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
स्थानिक वाहन व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. स्थानिक वाहतूकदारांना दिलासा मिळावा आणि टोल आकारणीबाबत पूर्वीची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन व उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीचे दिनेश चंद्र शर्मा, हरीश विभुते, मांगीलाल चौधरी, प्रमोद पाटील, जगदीश चौधरी, राजेंद्र तीडमे, दिलीप कापसे, राजेश चौधरी, महेश अहिरराव, दिनेश परदेशी, मोनेंद्र मेहता, कैलास पाटील, मसुद शेख, सईद सिकंदर शेख, वसीम मुस्ताक शेख, नासिर हुसेन शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
