अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय; ते काम ते उत्तम करत आहेत : अमित ठाकरे
मुलाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला मनसे नेत्यांचा सडेतोड पलटवार; नागपुरात पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका
नागपूर : मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी नागपूर दौऱ्यावर असलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेला आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भूमिका मांडल्यानंतर अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच, त्यांनी अमित ठाकरे यांच्या मुलाच्या शाळेचा मुद्दा उपस्थित करत, मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
या टीकेला उत्तर देताना अमित ठाकरे यांनी साटम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला.
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “अशा लोकांवर मी काय बोलू, ज्यांना स्वतःच्या भाषेचं, राज्याचं काहीच पडलेलं नाही.” तसेच अमित साटम यांच्या पूर्वीच्या एका कथित वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.
“तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे?” असा सवालही अमित ठाकरे यांनी केला.
पाचपावली परिसरातील सिंधू महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमित ठाकरे बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपमधील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
