पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक; ३०.९१ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त!
२० हजार ३८२ पाकिटांचा प्रतिबंधित साठा हस्तगत; बल्हाणे येथील तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपळनेर, ता. साक्री | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूची छुप्या पद्धतीने साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या धुळे विभागाने पिंपळनेर येथे मध्यरात्री धडक कारवाई केली. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३० लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वाहनांची तपासणी; प्रतिबंधित साठा उघड
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भारत गॅस परिसर, ईदगाहपाडा, सटाणा रोड, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथे पथकाने तपासणी केली. यावेळी एमएच-४६ बीएम-६०९७ आणि एमएच-४६ बीयू-७८८५ या क्रमांकांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
२० हजार ३८२ पाकिटे जप्त
तपासणीदरम्यान एकूण २० हजार ३८२ पाकिटे आढळून आली. या प्रतिबंधित मालाची किंमत ३० लाख ९१ हजार ९०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेला संपूर्ण साठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
बल्हाणे येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी साहेबराव वंजी साबळे, गणेश वंजी साबळे आणि संदीप गुलाब ठाकरे (तिघेही रा. बल्हाणे, ता. साक्री, जि. धुळे) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि धुळे येथील सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
