पदाला कामाची जोड द्या; दुष्काळात जनतेच्या दारात सर्वप्रथम शिवसैनिक उभा राहिला पाहिजे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पदाधिकाऱ्यांना कानपिचकी; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन
पिंप्री/धरणगाव/पाळधी/जळगाव, प्रतिनिधी | दि. ४ : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, गरीब कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा संकटाच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत प्रत्येक शिवसैनिकाने गावागावात आणि घराघरात पोहोचून नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले पाहिजे. “दुष्काळात मदतीची गरज असलेल्या माणसाच्या दारात सर्वप्रथम शिवसैनिक उभा दिसला पाहिजे. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही भूमिका केवळ भाषणात नको, ती कृतीत दिसली पाहिजे,” असे आवाहन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पिंप्री येथे आयोजित धरणगाव तालुका व शहर शिवसेना-युवासेना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळाचे गांभीर्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर संवाद साधला. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना कामाचा आरसा दाखवत “पदाला कामाची जोड असली पाहिजे. जे काम करत नाहीत त्यांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी,” अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या.
दुष्काळात गरीब माणसाचा चटका समजून घ्या
दुष्काळाचा पहिला फटका शेतकऱ्याला बसतो; मात्र त्यानंतर शेतमजूर, रोजंदारी करणारा कामगार, छोटा दुकानदार, गरीब विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुटुंबांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या मदतीला धावून जाणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून बँका किंवा वित्तीय संस्थांकडून सक्तीची अथवा अन्यायकारक कर्जवसुली केली जात असल्यास कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याला एकटे पडू देऊ नये. त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. गावातील पाणी, चारा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडेही कार्यकर्त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“जोश हवा; पण होशही तितकाच हवा”
पक्षसंघटनेचा आढावा घेताना पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कार्यकर्ता हा चळवळ निर्माण करणारा असला पाहिजे. त्याच्यात जोश हवा आणि होशही हवा. केवळ पद घेऊन घरी बसणाऱ्यांमुळे संघटना मोठी होत नाही. लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता हीच शिवसेनेची खरी ताकद आहे.”
प्रत्यक्ष जनतेत काम करणाऱ्या आणि संघटनेसाठी वेळ देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “माझे माझ्या कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम आहे. कार्यकर्ता संकटात असेल तर मी त्याच्या पाठीशी अहोरात्र उभा आहे; मात्र कार्यकर्त्यानेही जनतेशी नाळ कायम ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले.
शेकडो समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
आढावा बैठकीदरम्यान चावलखेडा, खामखेडा, कंडारी, धानोरा, गंगापुरी आणि परिसरातील माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नवप्रवेशितांचे स्वागत करताना पाटील यांनी त्यांना पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
“आजपासून तुम्ही शिवसेना परिवाराचा भाग आहात. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहा,” असे पाटील यांनी नव्या कार्यकर्त्यांना सांगितले.
बैठकीला पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती
बैठकीस युवा नेतृत्व तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, युवासेनेचे रोहित कोगटा, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, शहरप्रमुख धीरेंद्र पूर्भे, न. प. गटनेते विलास महाजन, पप्पू भावे, उपनगराध्यक्षा रुपाली महाजन, नगरसेविका कविता पाटील, महिला शहरप्रमुख भारती चौधरी, उपतालुकाप्रमुख मोतीलाल पाटील, गजानन पाटील, मंगलअण्णा पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. शरद माळी, पी. एम. पाटील आणि संजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भैय्या मराठे यांनी केले, तर आभार शहरप्रमुख धीरेंद्र पूर्भे यांनी मानले.
