पितृछत्र हरवले, पण जिद्द कायम; चेतन लांडगेची MBBSसाठी निवड!
NEET परीक्षेच्या काळात वडिलांचे निधन; आईच्या कष्टाची जाणीव ठेवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळवले यश, जि.प. सदस्या पुष्पाताई काळे यांच्याकडून विशेष सत्कार
सोयगाव, प्रतिनिधी – शिवराम जाधव : परिस्थिती प्रतिकूल असली, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असली आणि आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर पितृछत्र हरपले तरी जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती प्रामाणिकपणा असेल तर यशाचा मार्ग निश्चितच खुला होतो, हे दत्तवाडी सावरखेडा येथील चेतन दिलीप लांडगे या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. NEET परीक्षेच्या काळातच वडिलांचे दुःखद निधन झाले. मात्र, या मोठ्या आघातातून सावरत चेतनने आईच्या कष्टांची जाणीव मनात ठेवून अभ्यासाची जिद्द कायम ठेवली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला.
दुःखावर मात करत ध्येय गाठले
चेतनच्या कुटुंबावर NEET परीक्षेच्या काळातच दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाचा मोठा आधार हरपला. मात्र, या परिस्थितीने खचून न जाता चेतनने आपल्या वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगले. आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवत त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने NEETमध्ये यश मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी चेतनचे हे यश प्रेरणादायी ठरले आहे.
जि.प. सदस्या पुष्पाताई काळे यांच्याकडून सत्कार
चेतनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई काळे यांनी त्याच्या घरी भेट देऊन शाल व पुष्पगुच्छ देत त्याचा विशेष सत्कार केला. यावेळी त्यांनी चेतनला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“भविष्यातही अशीच मेहनत आणि जिद्द कायम ठेवून उत्तम डॉक्टर व्हा आणि गोरगरीब जनतेची सेवा करा,” अशा शब्दांत पुष्पाताई काळे यांनी चेतनला शुभेच्छा व आशीर्वाद दिला.
यावेळी गावातील महिला, ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श
चेतन लांडगेच्या या यशामुळे दत्तवाडी सावरखेडासह संपूर्ण सोयगाव तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय सोडायचे नाही आणि संकटांवर मात करून शिक्षणाच्या जोरावर स्वतःची वाट निर्माण करायची, असा संदेश चेतनच्या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत आहे.
