मैत्रेय गुंतवणूकदारांचा डेटा पुन्हा जमा करण्याची गरज नाही!
जळगाव आर्थिक गुन्हे विभागाला मैत्रेय असोसिएशनचे निवेदन; आधीच जमा केलेला जिल्ह्याचा संपूर्ण डेटा परस्पर वर्ग करण्याची मागणी
जळगाव, दि. ८ ऑक्टोबर : प्रतिनिधी
मैत्रेय गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मैत्रेय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव आर्थिक गुन्हे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विभागाकडून देण्यात आलेल्या पेपर नोटीसच्या अनुषंगाने असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, मैत्रेय गुंतवणूकदारांचा आवश्यक डेटा यापूर्वीच असोसिएशनच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रतिनिधी आणि ग्राहकांना पुन्हा त्याच कागदपत्रांसाठी त्रास होऊ नये, यासाठी पूर्वी जमा केलेला डेटा परस्पर वर्ग करून घ्यावा, अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
विशेषतः १० ऑक्टोबर रोजी प्रतिनिधींकडून पुन्हा कागदपत्रे जमा करून घेण्याची आवश्यकता भासू नये, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. यापूर्वीच संपूर्ण जिल्ह्याचा डेटा संकलित करून संबंधित विभागाकडे जमा करण्यात आला असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचा संपूर्ण डेटा संबंधित विभागाकडे यापूर्वीच सादर करण्यात आला असून, तो मुंबई येथील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, याचीही असोसिएशनने खात्री केली आहे.
त्यामुळे उपलब्ध असलेला डेटा संबंधित यंत्रणांनी परस्पर वापरात आणून गुंतवणूकदार, प्रतिनिधी आणि ग्राहकांना पुन्हा कागदपत्रे जमा करण्यासाठी होणारा त्रास टाळावा, अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे विभागाकडून या निवेदनावर आणि असोसिएशनच्या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे मैत्रेय गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
