गिरणा नदीवरील मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद
४० कोटींचा पूल झाला, मात्र तांत्रिक अडचणींमुळे बंधारा रखडला; प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश
पाळधी/मुंबई/जळगाव, प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर
गिरणा नदीवर मोठा साठवण बंधारा उभारून परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. बांभोरी–निमखेडीदरम्यान मंजूर झालेल्या पूल-कम-बंधारा प्रकल्पात तांत्रिक अडचणींमुळे बंधाऱ्याचे काम रखडले होते. मात्र, पूल झाला तरी बंधारा झालाच पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहत पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा जोरकसपणे मांडला. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या घडामोडींमुळे गिरणा नदीवरील मोठ्या साठवण बंधाऱ्याच्या प्रस्तावाला नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
२०२२ मध्ये ४० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता
जळगाव शहराजवळील बांभोरी–निमखेडीदरम्यान गिरणा नदीवरील विद्यमान पुलाला समांतर पूल-कम-बंधारा उभारण्याची संकल्पना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे आणली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सन २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती.
वाहतुकीची समस्या सोडविण्यासोबतच नदीतून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी उपयोग करणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश होता. मात्र, तांत्रिक सर्वेक्षणादरम्यान बंधाऱ्याच्या उभारणीसंदर्भात अडचणी निर्माण झाल्याने पुलाचे काम पूर्णत्वाकडे गेले; परंतु बंधाऱ्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
त्यानंतरही पालकमंत्री पाटील यांनी हा विषय सातत्याने लावून धरला. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून स्वतंत्र मोठा साठवण बंधारा उभारण्याचा पर्याय त्यांनी पुढे आणला. मंत्रालयातील बैठकीत त्यांनी तांत्रिक अडचणी दूर करून बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील कार्यवाहीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
शेतीला पाण्याचा आधार; भूजलपातळी वाढण्याची अपेक्षा
प्रस्तावित साठवण बंधाऱ्यामुळे गिरणा नदीतील पाणी अडवून परिसरात जलसाठा निर्माण करण्यास मदत होऊ शकते. परिणामी, परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजलपातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, पाणीटंचाईच्या काळात आधार निर्माण करणे आणि जलसंधारणाला चालना देणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
नदीपात्रात पाणीसाठा टिकून राहिल्यास नदीपात्राच्या संरक्षणालाही मदत होऊ शकते. अवैध वाळूउपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रभावी देखरेखीचीही आवश्यकता राहणार आहे.
तापी खोऱ्यातील प्रलंबित प्रकल्पांचाही आढावा
बैठकीत तापी खोरे जलनियोजन, तापी महाकाय पुनर्भरण योजना तसेच रावेर आणि यावल तालुक्यांसह जळगाव जिल्ह्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. हे प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
बैठकीला मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण आणि प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक मान्यता आणि प्रत्यक्ष बांधकामाबाबतच्या निर्णयांकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
