आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे
न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे मार्गदर्शन वर्ग; अग्निशामक यंत्राचा वापर, प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रात्यक्षिक
नशिराबाद प्रतिनिधी :
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि योग्य वेळी मदत करणे या बाबींचे महत्त्व लक्षात घेऊन न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय शाळा सुरक्षा धोरणांतर्गत राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीपूर्व तयारी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नाशिक येथील प्रशिक्षक फहीम पटेल यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राचा योग्य वापर, भूकंपाच्या वेळी घ्यावयाची दक्षता, प्रथमोपचार आणि सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
आपत्तीच्या वेळी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता कशी जपावी, जखमी व्यक्तीला प्राथमिक मदत कशी करावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यावा, याविषयी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. झोपे यांनी केले.
