धरणगावात पुस्तकांनी नव्हे, माणसांनीच दिली वाचनाची प्रेरणा!
पी.आर. हायस्कूलचा अभिनव ‘जिवंत ग्रंथालय’ उपक्रम; विद्यार्थ्यांनी अनुभवांतून वाचले जीवनाचे पुस्तक
धरणगाव प्रतिनिधी :
वाचन म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नव्हे, तर माणसांचे अनुभव, संघर्ष आणि जीवनमूल्ये समजून घेण्याची प्रक्रिया आहे, हा संदेश धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलने अभिनव उपक्रमातून दिला. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेत ‘जिवंत ग्रंथालय’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पुस्तकांच्या कपाटांऐवजी गावातील अनुभवी व्यक्तींनाच ‘जिवंत पुस्तके’ म्हणून विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. त्यांच्या जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना अनुभवांचे वाचन करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी आणि ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ विचारमंचावर उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना पुस्तकांची ओळख करून देतानाच माणसांची ओळख करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणूस म्हणजे एक न वाचलेले पुस्तक असून, त्याच्या अनुभवांतून जीवनाचे अनेक पैलू उलगडतात, असे त्यांनी सांगितले.
गावातील व्यक्ती बनली ‘जिवंत पुस्तके’
शाळेचे उपक्रमशील शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात गावातील पाच अनुभवी व्यक्तींना ‘जिवंत पुस्तके’ म्हणून विद्यार्थ्यांसमोर आणण्यात आले. यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील, हजारो भावनांचे संदेश पोहोचविणारे पोस्टमन सुनील पवार आणि गावातील अनेक बालकांच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या अंगणवाडी सेविका सुनीता पाटील यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी या ‘जिवंत पुस्तकांशी’ संवाद साधत प्रश्न विचारले आणि त्यांच्या अनुभवांमधून जीवनातील विविध पैलू समजून घेतले. बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. “बँक पैसा देते; पण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो,” असे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविका सुनीता पाटील यांनी लहान मुलांशी असलेल्या भावनिक नात्याविषयी मनोगत व्यक्त केले. लहान मुलांना आईसारखे प्रेम देत त्यांच्यासोबत रममाण होण्यातच आपल्याला आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले.
पोस्टमन सुनील पवार यांच्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना पत्रव्यवहाराचे महत्त्व, माणसांमधील भावनिक नाते आणि बदलत्या काळातील संवादाची साधने यांची ओळख झाली. त्यांच्या पोस्टमनकीच्या प्रवासातून एका पिढीच्या आठवणी आणि इतिहासाचे दर्शन घडले.
‘माणसांनाच पुस्तक केले, जेणेकरून मुले आयुष्य वाचायला शिकतील’
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविताना केवळ पुस्तकांचे वाचन न करता प्रत्यक्ष जीवनातील अनुभव समजून घेण्याची संधी या उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. “आज आम्ही माणसांनाच पुस्तक केले, जेणेकरून मुले आयुष्य वाचायला शिकतील. वाचन म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नव्हे, तर अनुभव वाचणे आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या आवडत्या विषयांवरील लेखनाचा समावेश असलेल्या ‘अक्षरयात्रा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. हे हस्तलिखित डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी दररोज दहा पाने वाचण्याचा संकल्प केला.
‘अनुभवांचे वाचन हीच खरी जिवंत शिक्षणपद्धती’
उपक्रमाची संकल्पना मांडणारे शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी आपल्या मनोगतात वाचनाचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, “डॉ. अब्दुल कलाम म्हणायचे, वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. आम्ही आज अनुभवाचे वाचन घडवून आणले. विद्यार्थी जेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यांतील दुष्काळ वाचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तो वाचक होईल. हीच खरी जिवंत शिक्षणपद्धती आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू शिरसाठ यांनी केले, तर संजय बेलदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. वैशाली गालापुरे, संदीप घुगे, प्रदीप असोदेकर, गणेश सूर्यवंशी, नंदू पाटील, सुरेंद्र सोनार, संजय बेलदार, प्रवीण पाटील, नीरज शिंदे, रवींद्र पाटील, गोपाल चौधरी, गोपाल सोनवणे, महेश पाठक, वंदना सोनवणे, सुरेखा तावडे, श्रीमती परदेशी यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
