ट्रॅक्टरवरून पडून चाकाखाली आल्याने २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
लोणवाडी ते वडगाव रस्त्यावरील घटना; ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू, परिसरात हळहळ
बोदवड, प्रतिनिधी : बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील गोपाल रवींद्र बावस्कर (वय २५) या तरुणाचा ट्रॅक्टरवरून पडून चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणवाडी ते वडगाव रस्त्यावर हुसेन रिसालोड्डिन यांच्या शेताजवळ घडली. तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे लोणवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तोल गेल्याने ट्रॅक्टरखाली आल्याची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल बावस्कर हा ट्रॅक्टरवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक त्याच्या पोटावरून गेले. त्यानंतर ट्रॉलीचे चाकही त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बोदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संदीप झरवाल करीत आहेत.
