प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेत दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रवेश!
बोदवड शहराध्यक्षपदी श्याम लुंड, तर तालुका संपर्कप्रमुखपदी भगवान सूर्यवंशी यांची निवड; दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेचा पुढाकार
बोदवड | प्रतिनिधी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचा कार्यविस्तार आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी बोदवड तालुक्यात संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. बोदवड तालुका अध्यक्ष रमेश लोहार यांच्या हस्ते शहराध्यक्षपदी श्याम लुंड, तर तालुका संपर्कप्रमुखपदी भगवान सूर्यवंशी यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी बोदवड शहरासह तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांनी मोठ्या उत्साहात संघटनेत प्रवेश केला.
दिव्यांगांच्या समस्या आणि शासकीय योजनांवर चर्चा
या कार्यक्रमाला बोदवड शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या विविध अडचणी, समस्या आणि शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करून तक्रारी जाणून घेण्यात आल्या.
विशेषतः संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना १ हजार ५०० रुपये, तर काही लाभार्थ्यांना २ हजार २०० रुपये अनुदान मिळत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. तसेच अनेक दिव्यांग बांधव धान्यापासून वंचित असल्याची बाबही उपस्थितांनी मांडली. यावेळी लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही तालुका अध्यक्ष रमेश लोहार यांनी दिली.
केवळ आश्वासने नव्हे, हक्कांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा
दिव्यांग बांधवांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या हक्कांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिव्यांगांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे बोदवड तालुका अध्यक्ष रमेश लोहार, उपाध्यक्ष बाळू पाटील, नवनियुक्त शहराध्यक्ष श्याम लुंड, तालुका संपर्कप्रमुख भगवान सूर्यवंशी, तालुका सल्लागार प्रल्हाद बेद्रे, प्रहार सेवक आबाराव देशमुख, अशोक तायडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष खुशबू शर्मा, तालुका उपाध्यक्ष मनीषा गोंधळी, तालुका उपसचिव मायाताई गवळी, तालुका सल्लागार संगीताताई वारुळे, योगेश देशमुख, गजानन गवळी, मेहंदी गुड्डू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
