धुळ्यात कायद्याचे राज्य की गुन्हेगारांचे? आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाची धक्काबुक्की!
आझादनगर पोलीस पथकावर हल्ला; पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी किरकोळ जखमी, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघे ताब्यात
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या आझादनगर पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलीस निरीक्षकांसह काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान जमावाने धक्काबुक्की करून आरोपीला पळवून नेल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचे धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून एका गुन्ह्यात फरार असलेला वडजाई रोड परिसरातील जब्बार शहा गुलाब शाह फकीर याला ताब्यात घेण्यासाठी आझादनगर पोलीस पथक गेले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तेथे जमलेल्या काही जणांनी पोलिसांना विरोध करत धक्काबुक्की केली. या गोंधळाचा फायदा घेत आरोपीला पळवून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शासकीय कामात अडथळा; तिघे ताब्यात
या घटनेनंतर आझादनगर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून, घटनेप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या पथकावरच अशा प्रकारे हल्ला होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच जमावाच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने या घटनेची शहरात चर्चा सुरू आहे.
