जळगाव पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर बडगा; ३.५८ लाखांचा दंड वसूल
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी (८ मे) सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. तब्बल पाच तास चाललेल्या या मोहिमेत संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तर कारवाईचे सुपरव्हिजन प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांनी केले.
२३१ पोलिसांचे विशेष पथक तैनात
या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांचा सक्रिय सहभाग होता. कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ३९ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह एकूण २३१ मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
ट्रिपल सीट आणि विनापरवाना वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई
विशेष नाकाबंदीत सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीट वाहन चालकांवर करण्यात आली. मोटार वाहन कायदा कलम १२८ अंतर्गत तीन जणांना बसवून वाहन चालविणाऱ्या १०६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या ९४ जणांवर दंड आकारण्यात आला.
याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४४ वाहनांवर आणि विनानंबर प्लेटच्या ७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्धही पोलिसांनी कठोर भूमिका घेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या ८ केसेस नोंदवल्या. गंभीर उल्लंघन करणारे एक वाहन पोलिसांनी जप्तही केले.
जळगाव व भुसावळ वाहतूक शाखेची मोठी कारवाई
जळगाव शहर वाहतूक शाखेने ६९ प्रकरणांत ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला, तर भुसावळ वाहतूक शाखेने ६९ हजार १०० रुपयांची दंडात्मक कारवाई करत सर्वाधिक दंड वसुलीची नोंद केली.
पुढेही अचानक नाकाबंदी मोहिमा
पोलीस प्रशासनाकडून आगामी काळातही जिल्ह्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक शिस्त कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक नाकाबंदी व तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
