‘दामिनी पथका’सह विशेष मोहिम; गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरातील तीन कॅफेंवर पोलिसांनी अचानक छापा टाकत धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून इतर कॅफे चालकांचेही धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. एम. जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेंमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तसेच गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.
‘दामिनी पथका’चीही सहभागिता
या विशेष पथकामध्ये पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेले दामिनी पथक देखील या कारवाईत सहभागी झाले होते.
दामिनी पथकाच्या उपस्थितीमुळे कॅफेंमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तसेच ‘कपल बॉक्स’सारख्या प्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉलेज परिसरातील वातावरणावर लक्ष
महाविद्यालयीन परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्दळ असते. त्यामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी तीनही कॅफेंची कसून झडती घेतली असून संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाईनंतर परिसरातील इतर कॅफे चालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
